कृती (५)Q 3 PAGE 6
स्वमत
‘वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. ते वेळ घालवण्यासाठी नसते’, हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
SOLUTION
खरे तर प्राचीन काळापासून वाहन निर्माण करणे, हे माणसाचे स्वप्न होते. त्याच्या मनात खोलवर रुजलेले हे स्वप्न प्राचीन कथांमधून, देवदेवतांच्या कथांमधून सतत व्यक्त होत राहिले आहे. माणसाच्या मनातल्या या प्रबळ प्रेरणेतूनच वाहनाची निर्मिती झाली आहे. वेळ आणि श्रम वाचवणे हाच वाहनाच्या निर्मितीमागील हेतू आहे.
अलीकडच्या काळात जीवनाचा वेग प्रचंड वाढला आहे. वेळ थोडा असतो. कामे भरपूर असतात. कामाची ठिकाणेसुद्धा दूर दूर असतात. अनेक ठिकाणी जावे लागते. अनेक माणसांना भेटावे लागते. म्हणूनच वाहनांची निर्मिती झाली आहे. वाहनांमुळे माणसाची प्रचंड प्रगती झाली आहे. त्यामुळे वाहनाला माणसाच्या जीवनात फार मोठे स्थान मिळालेले आहे. अशी ही अत्यंत महत्त्वाची वस्तू आपल्याकडे असावी, असे सगळ्यांना वाटू लागते.
माणसे धडपडून वाहने प्राप्त करतात. प्रतिष्ठा मिळवतात. पण वेळ व श्रम वाचवणे हा उद्देश मात्र त्यांच्या मनातून केव्हाच दूर होतो. वाहन हे साधन आहे. ते आपला वेळ वाचवते यात शंकाच नाही. परंतु काहीही केले तरी किमान वेळ हा लागतोच. शून्य वेळामध्ये आपण कुठेही पोहोचू शकत नाही. वाहन ही अखेरीस एक वस्तू आहे. वस्तूला तिच्या मर्यादा असतात. हे लक्षात न घेता आपण जास्तीत जास्त वेग वाढवून कमीत कमी वेळात पोहोचण्याचा हव्यास बाळगतो. अतिवेगामुळे आपलेच नुकसान होते. अनेक शारीरिक व्याधी आपल्याला जडतात. शारीरिक क्षमता उणावते. जगण्यातला आनंद कमी होतो. हे सर्व आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे.
पण हे कोणीही लक्षात घेत नाही. केवळ हौसेसाठी, गंमत-जंमत करण्यासाठी, आपल्याकडे गाडी आहे, ऐश्वर्य आहे हे दाखवण्यासाठी लोक गाडीचा उपयोग करतात. हळूहळू गाडीचे गुलाम बनतात. गाडी हे एक साधन आहे, हे आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे.