कृती (४) | Q 1 | Page 16
स्वमत.
‘जे काम करायचचं आहे, त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं’, या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
SOLUTION
शिक्षण घेताना आपण आपल्या आवडीचा विषय घेऊ शकतो, हे खरे आहे. काही वेळा आईवडिलांच्या आग्रहाला आपण बळी पडतो किंवा आपले सर्व मित्र जिकडे जातात, ती शाखा आपण निवडतो. कालांतराने आपली आपल्याला चूक उमगते. पण उशीर झालेला असतो. त्यानंतर काहीही करता येत नाही. निराश मनाने आपण शिक्षण घेतो अणि आयुष्यभर तशाच मन:स्थितीत जीवन जगत राहतो. त्यात सुख अजिबात नसते.
शिक्षणानंतर नोकरी-व्यवसाय निवडताना तसाच प्रश्न उद्भवतो. इथे मात्र आपल्याला निवड करण्याची बरीच संधी असते. या वेळी आपण आवडीचे क्षेत्र निवडायला हवे. क्षेत्र आवडीचे असल्यास आपण आनंदाने काम करू शकतो. मग काम कष्टाचे राहत नाही. आपल्या कामातून, कामाच्या कष्टातून आनंद मिळू शकतो.
मात्र इथेही एक अडचण असतेच. पण आवडीच्या विषयातील ज्ञान मिळवलेले असले, तरी नोकरी-व्यवसाय आवडीचाच मिळेल याची खात्री नसते. शिक्षण घेतलेले लाखो विद्यार्थी असतात. पण नोकऱ्या मात्र संख्येने खूप कमी असतात. त्यामुळे आपल्या आवडीची नोकरी आपल्याला मिळेल याची खात्री नसते. उपजीविका तर पार पाडायची असते. त्यामुळे मिळेल ती नोकरी स्वीकारावी लागते. अशा वेळी काय करायचे?
अशा वेळी वाट्याला आलेली नोकरी किंवा व्यवसाय आनंदाने केला पाहिजे. पण आनंदाने करायचा म्हणजे काय करायचे? कसे करायचे? तोपर्यंत आपण जे शिक्षण घेतलेले आहे, त्यातील सर्व ज्ञान, सर्व कौशल्ये पणाला लावली पाहिजेत. मग आपले काम आपल्याला अधिक जवळचे वाटू लागेल. तसेच, एवढे प्रयत्न अपुरे पडले तर आपले काम उत्तमातल्या उत्तम पद्धतीने करण्यासाठी गरज पडली, तर नवीन कौशल्ये शिकून घेतली पाहिजेत. काहीही करून आपले काम सर्वोत्कृष्ट झाले पाहिजे, असा आग्रह हवा. मग आपोआपच आपले काम सुंदर होईल. आपल्याला आनंद मिळेल आणि आपल्या कामाला प्रतिष्ठाही मिळेल.