कृती (५) [PAGE 19]
Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board Chapter 1 रे थांब जरा आषाढघना कृती (५) [Page 19]
कृती (५) | Q 1 | Page 19
रसग्रहण.
खालील ओळींचे रसग्रहण करा.
रे थांब जरा आषाढघना
बघुं दे दिठि भरुन तुझी करुणा
कोमल पाचूंचीं हीं शेतें
प्रवाळमातीमधलीं औतें
इंद्रनीळ वेळूंचीं बेटें
या तुझ्याच पदविन्यासखुणा
रोमांचित ही गंध-केतकी
फुटे फुलीं ही सोनचंपकी
लाजुन या जाईच्या लेकी
तुज चोरुन बघती पुन्हापुन्
ANSWER:
आशयसौंदर्य : कवी बा. भ. बोरकर यांच्या 'रे थांब जरा आषाढघना' या निसर्ग कवितेतील या उपरोक्त ओळी आहेत. आषाढ महिन्यात धुवाधार पाऊस पडतो आणि सृष्टीसौंदर्य फुलून येते. या नयनरम्य दृश्याचे वर्णन करताना कवी आषाढमेघाला थोडेसे थांबून हा सौंदर्यसोहळा पाहण्याची विनवणी करीत आहेत.
काव्यसौंदर्य : आकाशात आषाढमेघ दाटून आले आहेत. त्या आषाढमेघाला उद्देशून कवी म्हणतात - हे आषाढमेघा, जरासा थांब आणि तुझ्या कृपेने नटलेले निसर्गसौंदर्य मला तुझ्यासोबत डोळे भरून पाहू दे. कोमल नाजूक पाचूंच्या रंगाची ही हिरवीगार शेते, पोवळ्याच्या लाल रंगाच्या मातीत चालणारे नांगर, ही इंद्रनील रत्नांच्या प्रभेसारखी बांबूची बेटे या सर्व तुझ्याच पाऊलखुणा आहेत. तुझ्या आगमनाने रोमांचित झालेली सुवासिक केतकी, नुकतीच उमललेली सोनचाफ्याची कळी आणि जाईच्या लाजऱ्या मुली, तुला पुन्हा पुन्हा चोरून बघत आहेत. अशी ही तू निर्माण केलेली किमया पाहा.
भाषा वैशिष्ट्ये : उपरोक्त पंक्तीमध्ये कवींनी संस्कृतप्रचुर नादमय शब्दरचना केली आहे. आषाढाच्या आगमनाने भवतालची नटलेली सृष्टी नादमय शब्दकळेत रंगवलेली आहे. विशेष म्हणजे 'आषाढघन, केतकी, सोनचाफ्याची कळी, जाईची फुले' यावर मानवी भावनांचे आरोपण करून कवींनी
अंत : करणाला भिडणारे सौंदर्य प्रत्ययकारी रितीने मांडले आहे. निसर्ग आणि मानव यांतील सजीव अतूट नाते लालित्यपूर्ण शब्दांत चित्रित केले आहे. 'लाजणाऱ्या जाई नि रोमांचित होणारी केतकी' यातला हृदय भावनावेग रसिकांच्या मनाला भिडतो. नादानुकूल गेय शब्दकळेमुळे या ओळी ओठांवर रेंगाळतात.