कृती (५) | Q 2 | Page 16
अभिव्यक्ती.
तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल, ते लिहा.
SOLUTION
जीवन आनंदी होण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी मी करीन. त्यापैकी काही कृती शारीरिक पातळीवरील आहेत. तर काही मानसिक पातळीवरील आहेत.
शारीरिक पातळीवरील कृतींपैकी सर्वांत महत्त्वाची कृती म्हणजे स्वत:च्या शरीराची काळजी घेणे. स्वत:च्या शरीराची काळजी घेण्यासाठी प्रथम स्वत:च्या शरीरावर मनापासून प्रेम केले पाहिजे. स्वतःचे शरीर नीटनेटके, देखणे राखायचे, इतके की कोणालाही भेटल्यावर ती व्यक्ती आनंदित, प्रसन्न झाली पाहिजे. शरीर फक्त बाह्यतः सजवून ते देखणे होणार नाही. ते सतेज, सुदृढ व निरोगी राखले पाहिजे. त्या दृष्टीने मी योगासने किंवा व्यायाम सुरू करीन. नियमित व जीवनसत्त्वयुक्त आहाराचा अवलंब करीन. व्यसनांपासून चार हात दूरच राहीन.
शरीराबरोबरच मनाचे पोषण करण्यासाठी मी कलेचा आश्रय घेईन. मी अत्यंत चिकाटीने गायन, वादन, नर्तन, साहित्य, चित्रपट, नाट्य यांपैकी एका तरी कलेचा जाणतेपणाने आस्वाद घ्यायला शिकेन. शक्यतो एखादी कला आत्मसात करीन. माझी स्वत:ची बौद्धिक, शारीरिक व मानसिक क्षमता लक्षात घेऊन माझे यशाचे लक्ष्य निश्चित करीन आणि त्याचा पाठपुरावा करीन. अर्थात मला हेही ठाऊक आहे की केवळ यशामुळे उच्च पातळीवरचे मानसिक समाधान मिळू शकत नाही. साफल्याचा आनंद भौतिक यशाने पूर्णांशाने मिळत नाही. म्हणून कला क्रीडा-ज्ञान या क्षेत्रांत उच्च प्रतीचे कौशल्य मिळवायचा प्रयत्न करीन.
नोकरी-व्यवसायाच्या बाबतीत आवडीचेच क्षेत्र मिळेल असे सांगता येत नाही. मी माझ्या आवडीचे शिक्षण घेईन. आवडीच्या क्षेत्रात उपजीविकेचे साधन मिळवायचा प्रयत्न करीन. तसे नाही मिळाले, तर मिळालेले काम अत्यंत आवडीने करीन. मी घेतलेल्या शिक्षणातून मिळालेले ज्ञान माझ्या नोकरी-व्यवसायात वापरीन.
मला तर खात्रीने वाटते की माझा हा बेत यशस्वी झाला, तर मला सुखीसमाधानी आयुष्य मिळेल.