कृती (६) | Q 2 | Page 19
अभिव्यक्ती.
‘आषाढघनाचे आगमन झाले नाही तर...’ या विषयावर निबंध लिहा.
ANSWER:
आषाढघनाचे आगमन झाले नाही तर?
मध्यंतरी कोरोनाने अक्षरश: हैदोस घातला होता. जगातली सर्व कुटुंबे आपापल्या घरात कोंडून पडली होती. माणसाच्या गेल्या दहा हजार वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले हे. निसर्गाने माणसाला शिक्षाच द्यायला सुरुवात केली नसेल ना? गेली दहा हजार वर्षे माणूस स्वार्थासाठी निसर्गाचा ओरबाडतो आहे. पर्यावरण उद्ध्वस्त करीत आहे. त्याचा बदला तर नाही ना हा? आणखी काय काय घडणार आहे कोण जाणे! सध्याचाच ताप पाहा आधी. तापमानाचा पारा ४०°ला स्पर्श करीत आहे. आता पाऊस येईल तेव्हाच गारवा. त्यातच पाऊस या वर्षी उशिरा आला तर? अरे देवा! पण तो आलाच नाही तर?आषाढघनाचे दर्शनच घडले नाही तर?
परवाच बा. भ. बोरकर यांची कविता वाचत होतो. वाचता वाचता हरखून गेलो होतो. या पावसाळ्यात जायचेच, असा आमच्या घरात बेत आखला जात होता. गावी जायला मिळाले, तर आषाढघनाने नटलेले निसर्गसौंदर्य डोळे भरून पाहता येईल. कोमल, नाजूक पाचूच्या रांगांची हिरवीगार शेते, पोवळ्याच्या रंगाची लाल माती, रत्नांच्या प्रभेसारखी बांबूची बेटे, सोनचाफा, केतकी, जाईजुई यांचे आषाढी स्पर्शाने प्रफुल्लित झालेले सौंदर्य अनुभवायला मिळेल, हे खरे आहे. पण पाऊसच नसेल तर?
आषाढ महिना हा धुवाधार पावसाचा महिना. गडगडाटासह धो धो कोसळणाऱ्या पावसाचा महिना. कधी कधी हे आषाढघन रौद्ररूप धारण करतात. गावेच्या गावे जलमय होतात. डोंगरकडे कोसळतात. घरे बुडतात. गटारे ओसंडून वाहतात. सांडपाण्याची, मलमूत्राची सर्व घाण रस्तोरस्ती पसरते. घराघरात घुसते. मुकी जनावरे बिचारी वाहून जातात. हे सर्व परिणाम किरकोळ वाटावेत, अशी भीषण संकटे समोर उभी ठाकतात. दैनंदिन जीवन कोलमडून पडते. रोगराईचे तांडव सुरू होते. पाऊस नसेल, तर हे सर्व टळेल, यात शंकाच नाही.
मात्र, पाण्याशिवाय जीवन नाही. आणि माणूस हा तर करामती प्राणी आहे. तो पाणी मिळवण्याचे मार्ग शोधू लागेल. समुद्राचे पाणी वापरण्याजोगे करण्याचे कारखाने सुरू होतील. त्यामुळे प्यायला पाणी मिळेल. काही प्रमाणात शेती होईल. पण हे जेवढ्यास तेवढेच असेल. सर्वत्र पाऊस पडत आहे. रान हिरवेगार झाले आहे. फळाफुलांनी झाडे लगडली आहेत, अशी दृश्ये कधीच आणि कुठेही दिसणार नाही. बा. भ. बोरकरांच्या कवितेतील रमणीय दृश्य हे कल्पनारम्य चित्रपटातील फॅन्टसीसारखे असेल फक्त.
समुद्रातून पाणी मिळवण्याचा उपाय तसा खूप महागडा असेल. त्यातून सर्व मानवजातीच्या सर्व गरजा भागवता येणे अशक्य होईल. उपासमार मोठ्या प्रमाणात होईल. दंगली घडतील. लुटालुटीचे प्रकार सुरू होतील. थोडकीच माणसे शिल्लक राहिली, तर ती जगूच शकणार नाहीत. इतर प्राणी त्यांना जगू देणार नाहीत. माणूस फक्त स्वत:साठी पाणी मिळवील. पण उरलेल्या प्राणिसृष्टीचे काय? ही प्राणिसृष्टी माणसांवर चाल करून येईल. वरवर वाटते तितके जीवन सोपे नसेल. माणसांचे, प्राण्यांचे मृतदेह सर्वत्र दिसू लागतील. त्यांतून कल्पनातीत रोगांची निर्मिती होईल. एकूण काय? ती सर्वनाशाकडची वाटचाल असेल.
पाऊस नसेल, तर वीजही नसेल. एका रात्रीत सर्व कारखाने थंडगार पडतील. पाणी नसल्यामुळे शेती नसेल. फळबागाईत नसेल. नेहमीच्या अन्नधान्यासाठी माणूस समुद्रातून पाणी काढील, इथपर्यंत ठीक आहे. पण अन्य अनेक पिके घेणे महाप्रचंड कठीण होईल. या परिस्थितीतून अल्प माणसांकडे काही अधिकीच्या गोष्टी असतील. बाकी प्रचंड समुदाय दारिद्र्यात खितपत राहील. त्यातून प्रचंड अराजकता माजेल. याची भाषण चित्रे रंगवण्याची गरजच नाही. अल्पकाळातच जीवसृष्टी नष्ट होईल. उरेल फक्त रखरखीत, रणरणते वाळवंट. सूर्यमालिकेतील कोणत्याच ग्रहावर जीवसृष्टी अशीच नष्ट झाली नसेल ना?
नको, नको ते प्रश्न आणि त्या दृश्यांची ती वर्णने! एकच चिरकालिक सत्य आहे. ते म्हणजे पाऊस हवा, आषाढघन बरसायला हवाच!