कृती (४) | Q 3 | Page 16
स्वमत.
‘आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं’, या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
SOLUTION
एखादया दिवशी आपल्याला नको असलेला माणूस भेटतो. "कशाला भेटली ही ब्याद सकाळी सकाळी!" असे आपण मनातल्या मनात म्हणतो. तरीही आपण तोंड भरून हसत स्वागत करतो. आपल्या बोलण्यात, हसण्यात खोटेपणा भरलेला असतो. हे असे बऱ्याच वेळा होते. आपण खोटेपणाने जगतो. भेटलेल्या व्यक्तीमुळे आपल्याला आनंद होतच नाही. आनंदाचा, सुखाचा अनुभव आपल्याला मिळतच नाही; कारण आपले मन आधीच राग, द्वेष, मत्सराच्या भावनांनी भरलेले. अशा भावनांच्या वातावरणात आनंद निर्माण होऊच शकत नाही. मन ढगाळलेले असले की तेथे स्वच्छ सूर्यप्रकाश येऊच शकत नाही.
आनंदाचा, सुखाचा अनुभव मिळण्यासाठी आपले मन निर्मळ असले पाहिजे. कुत्सितपणा, द्वेष, मत्सर, हेवा असल्या कुभावनांपासून मन मुक्त हवे. जेथे कुभावनांची वस्ती असते, तेथे निर्मळपणा अशक्य असतो. निर्मळपणा असला की मन मोकळे होते. स्वच्छ होते. अशा मनातच आनंदाचा पाऊस पडतो. आपल्याला खरे सुख, खरा आनंद हवा असेल, तर मन स्वच्छ, मोकळे असले पाहिजे; कुभावनांना तिथून हाकलले पाहिजे.
आमच्या शेजारी सिद्धा नावाची बाई राहते. सिद्धाच्या मनात समोरच राहणाऱ्या अमिताविषयी दाट किल्मिषे भरलेली आहेत. अमिताविषयी बोलताना ती सर्व किल्मिषे जळमटांसारखी सिद्धाच्या तोंडून बाहेर पडतात. सिद्धा निर्मळ मनाने अमिताकडे पाहूच शकत नाही. साहजिकच अमिताच्या सहवासाचा सिद्धाचा अनुभव कधीही सुखकारक, आनंददायक नसतो. ज्या ज्या वेळी अमिताविषयी बोलणे निघते, त्या त्या वेळी सिद्धाचे मन कडवट होते. मनात कुभावनांचे ढग घेऊन वावरण्यामुळे सिद्धाला आनंद, खराखुरा आनंद मिळूच शकत नाही. लेखकांनी 'आनंदाच खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं,' असे म्हटले आहे, ते खरेच आहे.