Chapter 12: जगणं कॅक्टसचं
‘निसर्ग हा मोठा जादूगार आहे’, हे विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात कसे लागू पडते, ते पाठाच्या आधारे सविस्तर लिहा.
SOLUTION
जीवसृष्टी फुलण्यासाठी, बहरण्यासाठी पुरेसे पाणी, ओलावा, सुपीक माती असणे गरजेचे असते; पण वाळवंटी प्रदेशात अशी स्थिती नसते. ठणठणीत कोरडेपणा, पाण्याची प्रचंड कमतरता आणि जराही ओलावा नसलेली रेताड जमीन ही वाळवंटी प्रदेशाची प्राकृतिक वैशिष्ट्ये आहेत; मात्र अशा कठीण नैसर्गिक स्थितीतही निसर्गाने या ठिकाणी टिकून राहतील अशा वनस्पती आणि प्राणी निर्माण केले आहेत. वाळवंटी प्रदेशात वर्षातून एकदाच पाऊस पडतो.
कधी कधी तर दोन-तीन वर्षांच्या अंतराने पाऊस पडतो, खूप काळ चालणाऱ्या दुष्काळाच्या या काळात येथील झाडे-झुडपे निष्पर्ण होतात. या कठीण, प्रतिकूल काळानंतर जेव्हा एक दिवस पाऊस पडतो तेव्हा एखादी जादू व्हावी तशी जमिनीत दडून राहिलेल्या बियांमधून रोपे उगवतात, निष्पर्ण झाडाझुडपांना चैतन्यमयी पालवी फुटते. रोपांवर भरगच्च फुले फुलतात. बराच काळ वैराण, ओसाड असलेला हा प्रदेश विविधरंगी पानाफुलांनी बहरून जातो, चित्रमय दिसू लागतो. अशाप्रकारे, निसर्ग हा फार मोठा जादूगार आहे हे विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात लागू पडते हे या पाठाच्या आधारे स्पष्ट होते.
‘थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस!’ या विधानाची यथार्थता लिहा.
SOLUTION
कॅक्टस हा वाळवंटी प्रदेशामध्ये दुष्काळाचा सामना करत जगणार्या वनस्पतींचा जणू प्रतिनिधी आहे. वाळवंटात टिकून राहण्यासाठी निसर्गाने या झाडाला अनोखी वैशिष्ट्ये बहाल केली आहेत. पाऊस पडेल तेव्हा जे मिळेल ते पाणी कॅक्टस स्वतःमध्ये साठवून ठेवतो आणि कोरड्या हंगामामध्ये त्याची वाढ हळूहळू होत राहते. या झाडाच्या मुळांची रचना थोड्या वेळात पुष्कळ पाणी शोषून घेता येईल अशी असते. लांबवर मुळे पसरवून कॅक्टस सभोवतालच्या भागातील पाणी शोषून घेते. त्याचबरोबर कॅक्टसची अंगरचना पाणी साठवण्यासाठी अनुकूल अशी बनली आहे. त्याच्या अंगाचा कमीतकमी भाग कोरड्या, उष्ण हवेसमोर येतो. बहुतेक कॅक्टसची रचना घडीदार असल्यामुळे जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा घड्यांचा उपयोग पन्हाळीसारखा होऊन पावसाचे पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचते. त्याचबरोबर बाष्पीभवनापासून वाचण्यासाठी या झाडाला पानेच नसतात. या सर्व वैशिष्ट्यांमुळे कॅक्टस हा थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा उत्तम नमुना आहे', हे विधान यथार्थ वाटते.
टिपा लिहा.
SOLUTION
सग्वारो कॅक्टस:
सग्वारो कॅक्टस ही कॅक्टसच्या सर्व जातींमधील आकाराने मोठी आणि दीर्घ जीवनकाळ असणारी जात आहे.
अ) सग्वारो कॅक्टसचे दिसणे:
सग्वारो कॅक्टस हा हात वर करून उभ्या राहिलेल्या एखाद्या मोठ्या बाहुल्यासारखा दिसतो. तो ५० फूट उंचीपर्यंत वाढतो; मात्र त्याची ही वाढ अतिशय मंद गतीने होते. ५० वर्षांच्या कालावधीत तो फक्त ३ फूट वाढतो. त्याचा जीवनकाळ २०० वर्षांचा असतो. सग्वारो कॅक्टसच्या शेंड्यावर येणारी फुलं पुष्कळशी फुलासारखी गेंदेदार असतात. या फुलांमुळे बोचऱ्या ओसाड वाळवंटाला थोड्या कालावधीसाठी साैंदर्याचा स्पर्श होतो. त्याच्या या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे त्याला कॅक्टसचा राजा म्हणून ओळखले जाते.
ब) सग्वारो कॅक्टसचे उपयोग:
सग्वारो कॅक्टस हे वाळवंटातील प्रवासी आणि रहिवासी यांना वरदान ठरणारे एक उपयुक्त झाड आहे. पूर्वीच्या काळी अमेरिकेतील रेड इंडियन लोक याचा उपयोग अनेक प्रकारे करून घेत असत. दुष्काळात कॅक्टस चेचून त्यातील पाणी काढून ते पीत असत. या कॅक्टसला येणाऱ्या फळामधला गर कलिंगडाच्या गरासारखा लागतो. ही फळे रेड इंडियन लोक चवीने खात असत. या फळाचा गर साखर घालून मोरावळ्यासारखा टिकवताही येतो.
वाळवंटी प्रदेशातील झाडांना काटे असण्याची कोणकोणती कारणे असावीत, असे तुम्हांला वाटते ते लिहा.
SOLUTION
वाळवंटासारख्या कोरड्या, ओसाड प्रदेशात वनस्पतींचे प्रमाण खूपच कमी असते. उष्ण हवामान, रेताड माती, पाण्याची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून वाळवंटातील वनस्पतींनी आपले अस्तित्व टिकवून ठेवलेले असते. कॅक्टससारख्या झाडाने आपल्या शरीराच्या आतील भागात रसदार गराच्या स्वरूपात पाण्याचा साठा केलेला असतो. त्या रसदार गरासाठी प्राणी ह्या झाडावर हल्ला करण्याची शक्यता असते. असे झाल्यास ही झाडे नष्ट होण्याचा धोका असतो. त्यामुळे, स्वसंरक्षणासाठी येथील झाडांवर काटे असतात. हे काटे त्यांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी शस्त्रांप्रमाणे उपयोगी ठरतात.
‘पाणी हेच जीवन!’ या विधानासंबंधी तुमचे विचार लिहा.
SOLUTION
सजीव सृष्टीला जगण्यासाठी अत्यावश्यक असणारा घटक म्हणजे पाणी. वृक्ष असोत किंवा प्राणी, सर्व सजीवांना जगण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. मानवाला तर रोजच्या जीवनात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक कामे करताना पाण्याची गरज भासते. पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, शेते पिकवण्यासाठी, उद्योगधंदे चालवण्यासाठी, अगदी वीज निर्माण करण्यासाठी देखील माणसाला पाणी हे लागतेच. विज्ञानाच्या साहाय्याने यशाची शिखरे गाठणारा माणूस पाण्याला पर्याय शोधू शकलेला नाही. पाण्याशिवाय जीवसृष्टीची कल्पनाच करता येणार नाही. पाणी जर नसेल, तर पृथ्वीवरील जीवनच संपून जाईल, म्हणूनच 'पाणी हेच जीवन' हे विधान यथार्थ वाटते.