Chapter 16: स्वप्न करू साकार
खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा.
श्रमशक्तीचे मंत्र-
SOLUTION
आपल्या देशात औद्योगिक क्रांतीमुळे यंत्रयुग निर्माण झाले. त्यातून मजूर वर्ग, कष्टकरी वर्ग तयार झाला. त्यांच्या हातांनी यंत्रांना चालना दिली, त्यांच्या कष्टांतून चालना मिळालेली यंत्रे धडधडत जणू कष्टाचा महिमा गात आहेत, परिश्रमाचे मंत्र गात आहेत असा अर्थ प्रस्तुत शब्दसमूहातून व्यक्त होतो.
हस्त शुभंकर-
SOLUTION
या विश्वामधील साैंदर्य, ऐश्वर्य, वैभव यांचे संवर्धन, संगोपन करण्याच्या कामाला पाठिंबा देणाऱ्या, शुभ आशीर्वाद देणाऱ्या आश्वासक हातांच्या आधाराची गरज आहे, असे या शब्दसमूहातून कवी सांगू पाहत आहे.
आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार-
SOLUTION
श्रमशक्ती व यंत्रशक्तीच्या साहाय्याने येथील उद्योगी व कष्टकरी माणसांनी औद्योगिक क्रांती घडवली. या उत्क्रांतीची आकाश व्यापणारी ललकारी आपण देऊ असा अर्थ प्रस्तुत शब्दसमूहातून कवी व्यक्त करत आहे.
आकृतिबंध पूर्ण करा.
SOLUTION
उत्क्रांतीचा ललकार घुमवणारे घटक-
१. यंत्रशक्ती
२. श्रमशक्ती
३. उद्योगशक्ती
SOLUTION
देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक गोष्टी-
१. कृषिसंस्कृती
२. श्रमशक्ती
३. एकजूट
४. शुभाशीर्वाद
खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार
नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।
SOLUTION
कवी किशोर पाठक यांनी 'स्वप्न करू साकार' या कवितेत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न चित्रित केले आहे. या कवितेद्वारे कृषिसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकीचे बळ या मूल्यांचे महत्त्व कवी स्पष्ट करत आहेत. कवी आपल्या देशाचे वर्णन करताना अभिमानाने सांगतात, की या देशाच्या मातीवरती, या मायभूमीवरती आम्हां देशवासियांचा अधिकार आहे. नव्या पिढीचे, भारताच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न आम्ही प्रत्यक्षात आणू, असा निर्धारही ते व्यक्त करतात.
या ओळींद्वारे देशाविषयीचा, आपल्या जन्मभूमीविषयीचा अभिमान व्यक्त होतो. या अभिमानामुळे मायभूमीवरील प्रेमाचा अधिकार कवी सांगतो; पण पुढच्याच ओळींतून तो देशबांधवांना जबाबदारीचेही भान आणून देतो कारण येणाऱ्या नव्या पिढीचे, नव्या युगातील नव्या भारताचे स्वप्न तो पाहत आहे आणि ते प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी तो येथे मांडत आहे. 'स्वप्न करू साकार' या शब्दात त्याचा आशावादी, सकारात्मक दृष्टिकोन दिसतो.
खालील पंक्तीमधून सूचित होणारा अर्थ लिहा.
घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।।
SOLUTION
'स्वप्न करू साकार' या कवितेत कवी किशोर पाठक यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न चित्रित केले आहे. प्रस्तुत कवितेत कृषिसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकतेचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व स्पष्ट केले आहे.
वरील ओळीतून कवी एकजुटीचे व नव्या पिढीच्या कर्तृत्वाचे सामर्थ्य सांगू पाहत आहे. संख्येने अनेक असलो तरी आम्हां सर्व देशवासियांच्या मनगटांत एकीची शक्ती सामावली आहे. या शक्तीच्या बळावर आम्ही विजय मिळवत पुढे पुढे जात आहोत. येणारी नवी पिढीदेखील या देशाच्या उज्ज्वल भविष्याकरता उमेदीने, उत्साहाने कार्य करणारी अशी घडेल. घराघरांतून जन्मणारे प्रत्येक मूल तेजस्वी असेल. प्रत्येक घरात जणू तेजच नवा अवतार धारण करेल, अशी अनोखी कल्पना कवी करत आहे. या तेजस्वी पिढीमुळे देशाचे भवितव्य घडणार आहे, तिचे सामर्थ्य प्रस्तुत काव्यपंक्तीद्वारे कवीला मांडायचे आहे.
शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।
SOLUTION
'स्वप्न करू साकार' या कवितेत कवी किशोर पाठक यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न चित्रित केले आहे. प्रस्तुत कवितेत कृषिसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकतेचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व स्पष्ट केले आहे.
या देशात उगवणारी फुले, येथील मुले यांच्या प्रसन्नतेतून जणू येथला श्रावण खुलतो. येथील माती ही मंगलमय आहे. सर्वत्र जणू चैतन्यमयी वातावरण असते. येथील सुजलाम्, सुफलाम् धरतीतून आम्ही धान्यरूपी धन भरभरून पिकवू. त्यातून भरपूर संपत्ती प्राप्त होईल, असा प्रेरणादायी आशय प्रस्तुत काव्यपंक्तींतून कवी व्यक्त करू पाहतात. येथे कवी धान्याला मोत्यांची उपमा देतात. शेतीच्या विकासामुळेच देशाची भरभराट होईल, समृद्धी नांदेल ही महत्त्वाची गोष्ट ते ठळकपणे दाखवून देतात. कृषिसंस्कृतीचे दर्शन यातून आपल्याला घडते. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून शेत जणू मोती पिकवेल आणि त्यातून कधीही न संपणारे असे अपरंपार धन मिळेल, असे देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न कवी प्रस्तुत ओळींतून नेमकेपणाने मांडतात.
या कवितेत कवीने बघितलेले स्वप्न तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION
'स्वप्न करू साकार' या कवितेत कवी किशोर पाठक यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न चित्रित केले आहे. शेतीभाती भरघोस प्रमाणात पिकेल, भारतमाता सुजलाम्, सुफलाम् होईल, सर्वत्र चैतन्यमयी वातावरण असेल, मातीचे आरोग्य चांगले असेल, अशा धनधान्याने समृद्ध झालेल्या आपल्या देशात धन, संपत्ती, ऐश्वर्य नांदेल. लोकांमधील श्रमशक्ती कार्यरत होईल, यंत्रांना चालना मिळेल. उद्योगधंद्यांची भरभराट होईल, देशाला विकासाची वाट गवसेल. या उत्क्रांतीची ऐकू येणारी ललकारी आकाशव्यापी ठरेल. देशातील विविध जाती, धर्मांच्या लोकांत एकीचे बळ नांदेल. असा सुंदर भारत आम्ही घडवू. हे स्वप्न साकार करण्यासाठी विश्वातील ऐश्वर्य, वैभव टिकवून ठेवण्याचे व लाखपटीने वाढवण्याचे कार्य आम्ही करू, देशाचे भविष्य उज्ज्वल करण्याकरता आम्ही कंबर कसू, असा निर्धार कवीने देशबांधवांसोबत केला आहे, म्हणूनच कृषिसंस्कृतीचा विकास, श्रमप्रतिष्ठा, एकतेचे बळ यांद्वारे देशाला प्रगतिपथावर नेणे हे स्वप्न कवितेत रेखाटले गेले आहे.
कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार स्पष्ट करा.
SOLUTION
'स्वप्न करू साकार' या कवितेत कवी किशोर पाठक यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न चित्रित केले आहे. प्रस्तुत कवितेत कृषिसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा या मूल्यांसोबतच एकात्मता या मूल्याचे महत्त्व कवी स्पष्ट करत आहे.
कवी म्हणतात, की आम्ही देशवासीय असंख्य असलो तरी आमच्यात एकीचे बळ आहे. आमच्या मनगटांत एकतेची शक्ती आहे. या एकीचे दर्शन घराघरांतून जन्म घेणाऱ्या तेजस्वी अशा नव्या पिढीतही दिसेल असा सकारात्मक दृष्टिकोन कवी येथे व्यक्त करतात.
या देशाच्या मातीवर 'आमचा' अधिकार आहे आणि नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न 'आम्ही' मिळून साकार करू असा निर्धार व्यक्त करतात. शेतीचा विकास करून देशात 'आम्ही' समृद्धी आणू, यंत्रशक्तीला सोबत घेऊन उद्योगधंद्यांची भरभराट होईल, इतके श्रम करू, असा आशावादी विचार व्यक्त करतात. शिवाय, या एकीच्या बळावर विश्वातील ऐश्वर्याचे संवर्धन करण्याचा व ती लाखपटीने वाढवण्याचा विश्वास ते व्यक्त करतात. देशाच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने साकार होण्याकरता एकात्मतेचे सामर्थ्य अत्यंत महत्त्वाचे आहे, हेच कवी संपूर्ण कवितेत सांगू पाहतात.