Chapter 9: औक्षण
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तरे लिहा.
कष्टाचे सामर्थ्य अपुरे केव्हा वाटते?
SOLUTION
सीमेवर लढायला जाणाऱ्या वीर जवानाप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी हातात धन नाही, शरीरात रक्त नाही, काय करावे तेही कळत नाही अशावेळी आपल्या कष्टाचेही सामर्थ्य अपुरे पडते असे कवयित्रीला वाटते.
सैनिकाचे पाऊल जिद्दीचे का वाटते?
SOLUTION
डोक्यावरून तोफगोळ्यांचा, बंदुकीतल्या गोळ्यांचा वर्षाव, पुढ्यात उसळणारे धुराचे लोट, धडाडणाऱ्या तोफा अशा परिस्थितीतही न डगमगता सैनिक पुढे पुढे जातच राहतो, म्हणून त्याचे पाऊल जिद्दीचे वाटते.
डोळे भरून पाहावे असे दृश्य कोणते?
SOLUTION
सैनिकाची विजयी घोडदौड डोळे भरून पाहावी, असे कवयित्रीला वाटते.
योग्य पर्याय निवडा.
सैनिकाचे औक्षण केले जाते _________
OPTIONS
भरलेल्या डोळ्यांनी/भरलेल्या अंत:करणाने
डोळ्यांतील आसवांच्या ज्योतींनी
तबकातील निरांजनाने
भाकरीच्या तुकड्याने
कवितेतील ‘दीनदुबळे’ म्हणजे _______
OPTIONS
कष्टाचे, पैसे नसलेले
सैनिकाबरोबर लढणारे
शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेले
सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय
खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘अशा असंख्य ज्योतींची
तुझ्यामागून राखण;
दीनदुबळ्यांचे असें
तुला एकच औक्षण.’
SOLUTION
'औक्षण' म्हणजे ओवाळणे. सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांतर्फे केले जाणारे हे एक औक्षण आहे. त्या क्षणी मनात दाटून येणाऱ्या विविध भावभावना कवयित्री इंदिरा संत यांनी या कवितेत व्यक्त केल्या आहेत.
प्रस्तुत ओळींमध्ये कवयित्रीने डोळ्यांना निरांजनाची, तर अश्रूंना निरांजनातील ज्योतीची उपमा देऊन सैनिकाच्या रक्षणासाठी देशवासियांच्या असंख्य डोळ्यांतील असंख्य ज्योती त्याचे जणू औक्षण करत आहेत, अशी कल्पना येथे केलेली आहे. येथे पराक्रमी सैनिकाला सर्वार्थाने अक्षम, असमर्थ अशा सर्वसामान्यांकडून केले जाणारे हे औक्षण आहे, अशी भावना यात व्यक्त केली आहे. द्रव्यहीन, सामर्थ्यहीन असूनही सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सर्वसामान्यांचे नेमके या ओळींतून वर्णन केले आहे.
‘सैनिक सीमेवर तैनात असतो, म्हणून आपण सुरक्षित राहतो’, या विधानातील भाव स्पष्ट करा.
SOLUTION
आपले प्राण तळहातावर घेऊन देशाच्या रक्षणासाठी सीमेवर सुसज्ज असणाऱ्या जवानांमुळेच देशातील सर्वसामान्य जनता निर्धास्त जगू शकते, आपले रोजचे काम करू शकते, मुक्तपणे वावरू शकते. ते सीमेवर थंडी, ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता, डोळ्यांत तेल घालून कार्यरत असतात, त्यामुळेच आपण सुख-समाधानाने, शांतपणे आपले आयुष्य जगू शकतो. ते आपले घरदार, कुटुंब सोडून देशाकरता प्राण देण्यास तयार असतात, त्यामुळे आपली घरेदारे, शेतीभाती, आपले परिवार सुरक्षित असतात.
म्हणूनच, या सैनिकांच्या सर्वोच्च त्यागाबद्दल आपल्या सर्वांच्याच मनात कृतज्ञतेची भावना असते. ही कृतज्ञतेची भावना ’सैनिक सीमेवर तैनात असतो, म्हणून आपण सुरक्षित राहतो“ या विधानातून व्यक्त होते.
कवितेच्या संदर्भात ‘दीनदुबळे’ याचा कवयित्रीला अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्ट करा.
SOLUTION
कवयित्री इंदिरा संत यांच्या 'औक्षण' या कवितेत लढाईसाठी रणभूमीवर जाणाऱ्या सैनिकाला ओवाळताना मनात दाटून येणाऱ्या भावभावनांचे उत्कट चित्रण केले आहे. कवितेत 'दीनदुबळे' हा शब्द सर्वसामान्य देशवासियांसाठी वापरला आहे. सर्वसामान्य भारतीय नागरिकाकडे सैनिकांप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करण्यासाठी पुरेसे धन, शक्ती किंवा कष्टाचे सामर्थ्य नसते. या सैनिकावरून स्वत:चा जीव ओवाळून टाकायचे म्हटले तरी हा सामान्य जीव त्याच्या कर्तृत्वापुढे कमीच पडतो.
अगदी कठीण परिस्थितीतही-तोफगोळ्यांच्या, बंदुकीच्या गोळ्यांच्या वर्षावातही जिद्दीने पुढे पुढे जातच राहणाऱ्या या पराक्रमी वीर योद्ध्याच्या तुलनेत सर्व देशवासीय जनता दीनदुबळी आहे. सैनिकांचा अभिमान बाळगणाऱ्या, त्यांच्याप्रती आदर व कृतज्ञताभाव व्यक्त करण्याची मनोमन इच्छा धरणाऱ्या; पण निर्धन, सामर्थ्यहीन असणाऱ्या सर्वसामान्य लोकांना उद्देशून कवितेत 'दीनदुबळे' हा शब्द वापरला आहे.
‘देशसेवा हीच ईश्वरसेवा’ असे समजून कार्य करणाऱ्या सैनिकांसाठी तुम्हांला काय करावेसे वाटते ते लिहा.
SOLUTION
सीमेवर लढण्यासाठी जाणारा सैनिक 'देशसेवा हीच ईश्वरसेवा' या भावनेने देशसेवा करत असतो. कोणत्याही संकटाची पर्वा न करता, प्राणांची बाजी लावून देशाची सेवा करतो. अशा सैनिकांची प्रत्यक्षपणे मी काही मदत करू शकत नसलो तरीही माझ्या परिने जेवढे शक्य होईल तेवढी मदत करण्यासाठी मी सदैव तत्पर असेन.
माझ्या मते, आपण प्रत्येकाने थोडेसे डोळसपणे पाहिल्यास, खबरदारी बाळगल्यास, देशाच्या संरक्षणाची थोडीशी जबाबदारी उचलल्यास सैनिकांवरील भार काही प्रमाणात कमी होऊ शकतो. देशाचे रक्षण ही आपली जबाबदारी असल्याची भावना मनात रुजणे महत्त्वाचे ठरेल. आपल्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या सैनिकांना आपलेपणा वाटावा याकरता रक्षाबंधन, दिवाळी अशा सणांच्या वेळी राखी, फराळ, भेटवस्तू पाठवून त्यांच्याप्रतीच्या भावना, आदर व्यक्त करता येईल. सैनिकांकरता, त्यांच्या कुटुंबांकरता गोळा केल्या जाणाऱ्या फण्डसमध्ये शक्य तेवढी मदत करता येईल. अशारीतीने आपल्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या देशसेवा करणाऱ्या सैनिकांना थोडीशी मदत निश्चितपणे करता येईल.