कृती (३) खालील वाक्यात दडलेला वाक्प्रचार शोधा व लिहा.
कृती (३) | Q 3 | Page 48
1) माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी, म्हणून दातांची योजना झालेली आहे.
SOLUTION
वाक्प्रचार → दाती तृण धरणे.
कृती (३) खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार वाक्यपरिवर्तन करा.
1) परशाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता. (होकारार्थी करा.)
SOLUTION
परशाने प्रश्न उद्धटपणे विचारला होता.
2) शिंव्हाला काय भ्या हाय व्हय कुणाचं? (विधानार्थी करा.)
SOLUTION
शिंव्हाला कुणाचचं भ्या नाही.
3) तुझ्या अंगात लई हाडं हैत. (उद्गारार्थी करा.)
SOLUTION
किती हाडं हैत तुझ्या अंगात!
कृती (४) स्वमत.
कृती (४) | Q 1 | Page 49
1) पाठातील विनोद निर्माण करणारी पाच वाक्ये शोधा. ती तुम्हांला का आवडली ते सकारण लिहा.
SOLUTION
दंतकथा हा वसंत सबनीस यांचा बहारदार विनोदी लेख आहे. दातदुखी हा तसे पाहिले तर कारुण्यपूर्ण, वेदनादायक आणि गंभीर असा विषय. पण लेखकांनी नर्मविनोद, प्रसंगनिष्ठ विनोद, अतिशयोक्ती, कोट्या अशा अनेक साधनांच्या साहाय्याने अत्यंत प्रसन्न व वाचनीय असा लेख निर्माण केला आहे. त्यातली काही उदाहरणे आपण पाहू.
मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर नाही; कारण मराठी भाषेत अशी म्हण किंवा शब्दप्रयोग नाही ज्यांत दातांबद्दल मंगल भावना व्यक्त झाली आहे. लेखकांची ही दोन वाक्ये पाहा. त्यांना दातदुखीचा खूपच त्रास झाला होता. यामुळे त्यांच्या मनात दातांबद्दल प्रेम नाही. किंबहुना काहीसा रागच आहे. हा राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी मराठी भाषेचा किती चपखल उपयोग केला आहे पाहा. मराठी भाषेत दातांबद्दल मंगल भावना व्यक्त करणारी म्हण नाही. हे त्यांचे म्हणणे पहिल्यांदा वाचताना जरा गंमत वाटते. थोडे बारकाईने पाहिल्यावर, अनेक म्हणी आठवल्यावर लेखकांचे म्हणणे खरे असल्याचे लक्षात येते.
डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, एखादी खळी माणसाला गुंतवतात; पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून भेटायचा आहे. हेसुद्धा एक गमतीदार वास्तव आहे. लेखकांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीचा येथे प्रत्यय येतो. दात पाहून वेडा झालेला प्रियकर हा उल्लेख नुसता वाचताक्षणी हसू आल्याशिवाय राहत नाही.
दातदुखीतल्या ठणक्याची तीव्रता सांगताना लेखकांनी दिलेले उदाहरण लक्षणीय आहे. ते लिहितात, "एखादा लाकूडतोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो." हा दाखलासुद्धा अप्रतिम आहे. हे उदाहरण चमत्कृतीपूर्ण आहे. दातदुखीच्या वेदनेचा ठणका हे उदाहरण वाचतानाही आपण अनुभव. लेखकांचे हे विनोद निर्मितीचे कौशल्य विलक्षणच आहे.
2) लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळविक्राळ राक्षसाशी केलेली आहे, याबाबत तुमचे मत लिहा.
SOLUTION
दातदुखीच्या भयानक वेदनांचा अनुभव तसा सगळ्यांनाच परिचयाचा आहे. त्या वेदना सहन करण्याच्या पलीकडच्या असतात. बोंबा मारणे याखेरीज दुसरा मार्गच नसतो. हाताला, पायाला किंवा डोक्याला कुठेही जखम झाली, तर मलमपट्टी करता येते. दातदुखीबाबत मात्र काहीही करता येत नाही. डोके दुखत असेल, अंग दुखत असेल, तर शेक दिल्यावर जरा आराम पडतो. डोके दाबून दिले, अंग जरा रगडले, पाय चेपून दिले, तर बरे वाटते. दातदुखीबाबत मात्र यातला कोणताच उपाय उपयोगी येत नाही.
दातदुखीच्या प्रसंगातील लेखकांचे निरीक्षण मात्र बहारीचे आहे. ते इतके अचूक आहे की, स्वतःची दातदुखी आठवू लागते. दातदुखी, दाढदुखी ठणके जीवघेणे असतात. आपल्या दाढेच्या मुळाशी एखादा लाकूडतोड्या बसून एकामागून एक दातांच्या मुळावर घाव घालीत तर नाही ना, असे वाटत राहते. डॉक्टरांनी दिलेल्या औषधाने काही क्षण थोडे बरे वाटते. पण तेवढ्यात जीवघेणे ठणके सुरू होतात. प्रत्येक ठणक्याबरोबर वेदना कपाळात शिरते आणि ती डोके फोडून बाहेर पडेल, असे वाटत राहते. वेदनेचे स्वरूप अवाढव्य असते. तिला राक्षसाखेरीज अन्य कोणतीही उपमा लागू पडत नाही.
दिवस कसाबसा जातो. पण रात्री मात्र छातीत धडकी भरायला सुरुवात होते. आता रात्री ठणके मारू लागले तर? या कल्पनेनेच जीव अर्धमेला होतो. ठणके सुरू झाल्यावर मात्र बोंबा मारण्याखेरीज आपल्या हातात काहीही राहत नाही. रात्री वाहन मिळत नाही. डॉक्टरांचा दवाखाना बंद असतो. हॉस्पिटल कुठेतरी खूप दूर असते. भीतीने जीव अर्धा जातो. डोक्यात घणाचे घाव पडत असतात. अन्य लोक आपल्याला मदत करू शकतात. पण ते आपल्या वेदना घेऊ शकत नाहीत. त्या वेदना सहन करणाऱ्यालाच लेखकांनी दातदुखीला दिलेली अक्राळविक्राळ राक्षसाची उपमा कळू शकेल
3) लेखकाच्या दातदुखीबाबत शेजाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या संदर्भात एक छोटे टिपण तयार करा.
SOLUTION
आपला देश परंपराप्रिय आहे. अनेक परंपरा आपण प्राणपणाने जपतो. या परंपरांमधली एक आहे आजारी माणसाला भेटायला जाणे. एखादा माणूस जर हॉस्पिटलमध्ये दाखल झाला, तर मग काही विचारायलाच नको. लोक जथ्याजथ्याने आजारी माणसाला भेटायला जातात. यामागची कल्पना अशी की, आजारामध्ये माणूस कमकुवत बनतो. मानसिक दृष्टीनेही थोडा कमकुवत बनतो. या काळात आजारी माणसाला धीर दिला पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजेत, या समजुतीनेही भेटायला जातात. आपण आजाऱ्यासोबत थोडा वेळ बसलो, गप्पागोष्टी केल्या तर त्याला विरंगुळाही मिळतो. हे असेच घडले तर ते चांगलेच आहे.
प्रत्यक्षात काय दिसते? माणसे भेटायला जातात. पण गप्पागोष्टी काय करतात? थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या की, गप्पांची गाडी आजारी व्यक्तीच्या रोगावरच येते. मग त्या रोगांसंबंधात नको नको त्या गोष्टी चर्चिल्या जातात. रोग कसा भयंकर आहे, किती त्रास होतो, नुकसान कसकसे होत जाते, काही माणसे कशी दगावली आहेत इत्यादी इत्यादी. या गप्पांमुळे आजारी व्यक्तीचे मनोबल वाढण्याऐवजी त्याचे खच्चीकरण होते. त्याची चिंता वाढते, तो नकारात्मक दृष्टीने विचार करू लागतो. तो मानसिकदृष्ट्या खचतो. अशा स्थितीत आजाराशी लढण्याची उमेद कमी होते. याचा प्रकृती सुधारण्यावर विपरीत परिणाम होतो.
माणसे हॉस्पिटलमध्ये भेटायला जातात, तेव्हा वेळ मर्यादित असतो. तो ठरावीक कालावधीतच असतो. त्या वेळी ठीक असते. पण आजारी व्यक्ती घरी असली, तर माणसे कधीही, कितीही वाजता आजारी व्यक्तीच्या घरी थडकतात. कितीही वेळ बोलत बसतात. त्या व्यक्तीची अन्य काही कामे आहेत का, घरच्यांच्या काही अडचणी आहेत का, घरच्यांपैकी कोणाला बाहेर जायचे आहे का, विश्रांतीची वेळ आहे का, वगैरे वगैरे अनेक गोष्टी असतात. त्यांचा कोण विचार करीत नाहीत. आजारी व्यक्तीला अडचणीत आणतात. खरे तर आजारी व्यक्तीला अन्य व्यक्तींचा कमीत कमी संसर्ग झाला पाहिजे. पण हे पथ्य तर कोणी पाळतच नाहीत.
आजारी व्यक्तींना भेटण्यासंबंधात काही एक पथ्ये, नियम करून त्यांचा प्रचार करणे खूप गरजेचे आहे.
कृती (५) अभिव्यक्ती.
कृती (५) | Q 1 | Page 49
1) प्रस्तुत पाठ तुम्हांला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा.
SOLUTION
पाठ्यपुस्तकात वेगवेगळे पाठ आहेत. त्यांपैकी 'दंतकथा' हा विनोदी पाठ मला खूप आवडला. पुन्हा पुन्हा वाचून मी आनंद घेतला. लेखक आहेत वसंत सबनीस.
वास्तविक दातदुखी हा अत्यंत वेदनादायक, माणसाला असहाय करणारा प्रसंग. त्या प्रसंगावर हा लेख आधारलेला आहे. मात्र लेखक त्या प्रसंगाकडे कारुण्यपूर्ण नजरेने न पाहता एका गमतीदार, खेळकर दृष्टीने पाहतात. घटनेकडे पाहण्याचा कोनच बदलल्यामुळे घटनेचे रूपच बदलून जाते. त्यामुळे माणसाच्या वागण्यातील हास्यास्पद, विसंगती अधिक ठळकपणे लक्षात येतात.
हे बदललेले रूप लेखकांनी नर्मविनोदी शैलीत चित्रित केले आहे. प्रसंग खेळकर, तिरकस नजरेने पाहिल्यामुळे, नर्मविनोदी शब्दयोजनेमुळे वाचकाच्या चेहेऱ्यावर स्मित रेषा उमटतेच. कधी कधी वाचक खळखळून हसतो. लेखकांनी मनुष्यस्वभावाचे नमुने मार्मिकपणे टिपले आहेत. तसेच विसंगतीही वाचकांना हसवत हसवत दाखवून दिल्या आहेत. दातदुखीच्या वेळी वास्तवात घडणारे प्रसंग अतिशयोक्तीचा बहारदार वापर करीत वर्णिले आहेत. म्हणी-वाक्प्रचारांवर कोटी करून गमती साधलेल्या आहेत. शाब्दिक कोट्यांचा सुरेख वापर केला आहे. यांमुळे संपूर्ण लेख चुरचुरीत, वाचनीय झाला आहे.
एक-दोन उदाहरणे पाहू. लेखाच्या सुरुवातीलाच दाताची पंचमहाभूतांशी सांगड घातली आहे. पंचमहाभूते ही संपूर्ण विश्वाच्या रचनेतील मूलभूत तत्त्वे आहेत. तर दात हा एक माणसाचा सामान्य अवयव. या दाताला लेखकांनी सहावे महाभूत म्हटले आहे. अत्यंत सामान्य गोष्टी महान दर्जा दिल्यामुळे गमतीदार विरोधाभास निर्माण झाला. पुढच्याच परिच्छेदात, परमेश्वराला दाताची कल्पना सहा-सात महिन्यांनंतर सुचली असावी, असा लेखकांनी उल्लेख केला. हे वाचताक्षणी हसू येते. परमेश्वर सर्वशक्तिमान, परिपूर्ण. तरीही दातांची कल्पना उशिरा सुचल्याचे लिहून लेखकांनी ईश्वराला माणसाच्या जवळ आणले. त्यामुळे इथेही एक गमतीदार विरोधाभास निर्माण होतो.
भाषेतील निरीक्षणही बहारीचे आहे. दातासंबंधात एकही मंगलमय म्हण वा वाक्प्रचार मराठीत नाही. दातांवरून ज्या म्हणी-वाक्प्रचार आहेत, त्या दारिद्र्य, भिकारपणा व असभ्यपणा यांचा निर्देश करणाऱ्या आहेत. हा उल्लेख भाषेला खमंगपणा आणतो. 'दात पाहून प्रेयसीसाठी वेडा झालेला प्रियकर' अजून पाहिला नसल्याचे ते नमूद करतात.
या अशा उल्लेखांमुळे लेखाला खेळकरपणा चुरचुरीतपणा व गमतीदारपणा प्राप्त झाला आहे. कोणत्याही वाचकाला तो सहज आवडेल असा आहे.
दंतकथा [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ] Dantkatha 12th Marathi Yuvakbharti