कथा-साहि त्यप्र कार-परिचय | Katha Sahityaprakar parichay | इयत्ता 12 मराठी कथा -साहित्यप्रकार परिचय
कथा-साहि त्यप्र कार-परिचय | Katha Sahityaprakar parichay
कृती (१) कृती करा.
कृती (१) | Q 1 | Page 68
1) कथेचे घटक: _________
SOLUTION
(१) कथाबीज
(२) कथानक
(३) पात्रचित्रण
(४) नाट्यमयता
(५) भाषाशैली
कृती (१) | Q 2 | Page 68
2) कथेची वैशिष्ट्ये: _________
SOLUTION
(१) कथा मनोरंजन करते.
(२) कथेमुळे सुसंस्कार होतात.
(३) वाचकांची उत्कंठा वाढते.
(४) कथा एककेंद्री असते.
(५) कथा श्रवणीय असते.
कृती (२) | Q 1.1 | Page 68
3)कथा म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा.
SOLUTION
कथेमध्ये घटना असतात. या घटनांना एखादया सूत्रानुसार गुंफण्यासाठी कथानक असते. कथानकात पात्रे असतात. वास्तवातल्या माणसांसारखीच ही पात्रे चित्रित केलेली असतात. वास्तवातली माणसे जशी एकमेकांशी वागतात, तशीच पात्रेसुद्धा एकमेकांशी वागतात. ती एकमेकांशी भांडतात. एकमेकांना मदत करतात. एकमेकांवर प्रेम करतात. राग, लोभ, प्रेम, असूया, दया, सहानुभूती वगैरे भावभावना वास्तवातल्या माणसांमध्ये असतात. तशाच भावभावना पात्रांमध्येही असतात. पात्रांच्या एकमेकांशी वागण्यातून घटना निर्माण होतात. तसेच, कथेमध्ये स्थळ, काळ, वेळ यांचेही चित्रण केलेले असते. कथेच्या विषयानुसार वातावरण असते. पात्रांच्या परस्परांशी वागण्यातून ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत निर्माण होते. या सर्व घटकांनी युक्त अशी रचना घेऊन कथा निर्माण होते. तिला समर्पक शीर्षक मिळाले की कथा परिपूर्ण होते.
कृती (२) | Q 1.2 | Page 68
4) कथेचे कोणतेही दोन घटक सोदाहरण स्पष्ट करा.
SOLUTION
(१) कथाबीज : कथेत अनेक घटना असतात. लेखक या घटनांची सुंदर गुंफण करतो. ही सुंदर गुंफण म्हणजे कथा होय. ही संपूर्ण कथा म्हणा किंवा घटनांची मालिका म्हणा, आपण आत्यंतिक संक्षिप्त स्वरूपात दोन-तीन वाक्यांत सांगू शकतो. संपूर्ण कथेची ही संक्षिप्त घटना होय. हे संक्षिप्त रूप म्हणजे कथाबीज होय.
उदा., पुढील कथाबीज पाहा : 'हा आपलाच मुलगा आहे', असा एकाच मुलाच्या बाबतीत दावा करणाऱ्या दोन स्त्रियांचे भांडण न्यायाधीशांकडे जाते. आपल्या बुद्धिचातुर्याने न्यायनिवाडा करून न्यायाधीश खऱ्या आईला तिचा मुलगा मिळवून देतात.
(२) पात्रचित्रण : पात्र म्हणजे कथानकातील व्यक्तीच होत. वास्तवातील माणसांसारखेच पात्रांचे चित्रण लेखक करतो. या व्यक्तींच्या वृत्ती-प्रवृत्ती, त्यांच्या भावभावना, त्यांचे विचार, कल्पना, त्यांचे वागणे वगैरे सर्वच बाबी लेखक वास्तवातील माणसांसारखेच संगीत. त्यांचे राग, लोभ, प्रेम, द्वेष, हेवेदावे वास्तवातील माणसांसारखेच रंगवलेले असते. वाचकांना ही पात्रे खऱ्याखुऱ्या माणसांसारखी वाटतात. त्यांच्याशी ते समरस होतात आणि कथेचा आस्वाद घेतात. पात्रांच्या वागण्यातून कथानक हळूहळू उलगडत जाते. पात्रचित्रण हा घटक कथेमध्ये यामुळे खूप महत्त्वाचे कार्य करतो.
कृती (२) | Q 1.4 | Page 68
5) कथाकथनासाठी कथेची निवड करणे फार महत्त्वाचे आणि तितकेच जबाबदारीचे काम असते,' हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
SOLUTION
कथाकथनासाठी कथा निवडताना श्रोते कोणत्या वर्गातील आहेत, हे प्रथम लक्षात घ्यावे लागते. ग्रामीण, शहरी, शिक्षित, अशिक्षित, उच्चभ्रू वर्गातील की सर्वसाधारण वर्गातील, स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, कारखान्यातील कामगार, मंत्रालयातील कर्मचारी, महाविद्यालयीन अशांपैकी कोणत्या वर्गातील श्रोते बहुसंख्येने असतील, हे आधी पाहावे लागते. कारण या प्रत्येक वर्गातील श्रोत्यांच्या जीवनविषयक धारणा वेगवेगळ्या असतात. त्यांच्या अभिरुचीचा स्तर वेगवेगळा असतो. तसेच, कथाकथनाचा कालावधी किती, हाही मुद्दा खूप महत्त्वाचा असतो. श्रोत्यांच्या अवधानकाळाचेही भान बाळगावे लागते. एवढे पाहिल्यावर कथा कोणत्या प्रकारची, तिची लांबी किती हेही ठरवावे लागते. या सर्व कसोट्यांना उतरणारी कथा निवडावी लागते. ही निवड जबाबदारीने केली नाही, तर कथाकथनाचा कार्यक्रम साफ कोसळण्याचा धोका असतो.
कृती (२) | Q 1.5 | Page 68
6) कथेच्या लोकप्रियतेची कारणे लिहा.
SOLUTION
(१) भाषासौंदर्य
(२) आशय सौंदर्य
(३) अभिव्यक्ती विशेष
(४) सादरीकरण शक्य
(५) मनोरंजन व बोध
कृती (२) | Q 1.6 | Page 68
7) कथेच्या सादरीकरणासाठी आवश्यक भाषिक कौशल्ये लिहा.
SOLUTION
(१) विविध लेखकलेखिकांची भाषाशैली समजून घेण्याची क्षमता
(२) भाषेची जाण
(३) शब्दोच्चार
(४) प्रकट वाचन करण्याची क्षमता
कृती (३) | Q 1 | Page 68
8) कथेच्या शीर्षकाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
SOLUTION
कथा पूर्ण झाल्यावर एक अवघड कामगिरी लेखकाला पार पाडावी लागते. ती म्हणजे कथेचे शीर्षक निश्चित करणे. शीर्षक निश्चित करणे हे खूप जिकिरीचे काम असते. कारण शीर्षकाकडून खूप अपेक्षा सर्वांच्या मनात असतात. शीर्षक हे कथेचा चेहेरा असते. चेहेऱ्यावरून जशी माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची खूण पटते, तशी शीर्षकावरून कथेच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख पटत असते.
शीर्षक आकर्षक हवे. त्यासाठी आकर्षक शब्दयोजना करण्याचा प्रयत्न लेखकाकडून होतो. मग एखादी लोकप्रिय म्हण, वाक्प्रचार, सुप्रसिद्ध लोकोक्ती, प्रचलित प्रभावी शब्द प्रयोग यांचा विचार केला जातो. या घटकांमुळे वाचकांचे कथेकडे लक्ष आकर्षिक व्हायला हवे. शीर्षकाने वाचकाच्या मनात कुतूहल निर्माण केले पाहिजे. हे सर्व आवश्यक असते. तरीही हा बराचसा बाह्य भाग झाला. शीर्षकातून कथेतील मूल्यांचा संघर्ष, नैतिक संघर्ष यांचे सूचन झाले पाहिजे. कथेचे सारच जर शीर्षकातून व्यक्त करता आले, तर ते फारच उत्तम. शीर्षक ही आकाराने खूप लहानशी गोष्ट आहे. पण ती खूप वेळ व शक्ती खर्च करायला लावणारी मोठी बाब आहे.
कृती (४) | Q 1 | Page 68
9) कथा आजही लोकप्रिय आहे,' या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
SOLUTION
कथावाङ्मय हे आजही लोकप्रिय आहे. मनोरंजन करणे आणि उद्बोधन करणे या दोन कारणांसाठी कथावाङ्मय खूप वापरले गेले आहे. द. मा. मिरासदार, शंकर पाटील, व. पु. काळे, पु. ल. देशपांडे हे दोन पिढ्यांमागचे लेखक आजही लोकप्रिय आहेत. राजकीय, सामाजिक, धार्मिक कारणांनी समाजात प्रचंड उलथापालथी चालू आहेत. या उलथापालथीमध्ये आपापल्या मतांचा प्रचार करण्यासाठी, लोकांचे मन वळवण्यासाठी समाजमाध्यमांवर कथांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला आहे. हे कथावाङ्मयाच्या लोकप्रियतेचे लक्षण आहे.
सध्याचा काळ हा खूप धावता काळ आहे. लोकांकडे वेळ खूप कमी आहे. अशा वेळी कमी वेळात कथाच प्रभावीपणे सादर होऊ शकली आहे. दुसरे असे की मराठी कथेने आता विविध विषयांना स्वीकारले आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांचे प्रतिबिंब मराठी कथेत पडू लागले आहे. म्हणून कथा लोकप्रिय झाली आहे.
कृती (५) | Q 1 | Page 69
10) प्रभावी कथाकथन करण्यासाठी कथाकथन करणाऱ्याने कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे?
SOLUTION
कथाकथन करणाऱ्या प्रथम श्रोत्यांचे स्वरूप लक्षात घेतले पाहिजे. श्रोत्यांच्या स्वरूपानुसार कथेची निवड करावी लागते. कथाकथनाचा कालावधी व श्रोत्यांचा अवधानकाल या बाबीही लक्षात घ्याव्या लागतात. श्रोत्यांशी संवाद साधत साधत आणि त्यांचा प्रतिसाद घेत घेत कथाकथन करायचे असल्याने शब्दफेक, प्रभावी उच्चारण, उच्चारांतील चढ-उतार, स्पष्टता इत्यादी बाबी खूप महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे कथाकथन करणाऱ्यांकडे वाचिक अभिनय याचे कौशल्य असावेच लागते. आणखी एक बाब लक्षात घ्यायला हवी. कथाकथन करताना हातात लिखित मजकूर नसतो; त्यामुळे पाठांतर उत्तम असावेच लागते. या सर्व बाबींची काळजी कथाकथन करणाऱ्याने घेतली पाहिजे.
कृती (६) | Q 1 | Page 69
11) तुम्ही वाचलेली कथा थोडक्यात सादर करा.
SOLUTION
स्वतः करा
कथा-साहि त्यप्र कार-परिचय | Katha Sahityaprakar parichay
प्रस्तावना
मनुष्य आपले अनुभव व कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हाच त्यांची गोष्ट झाली आणि त्यातून कथेचा जन्म झाला. ‘कथा’ या शब्दाचा शब्दश: अर्थ गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन असा आहे. लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दांत पूर्वी गोष्ट सांगितली जात असे. या श्रवण-गोष्टीतून मनोरंजन व अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा प्रयत्न होत असे. मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या व लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या ‘कथा’ या वाङ्मयप्रकाराला उत्तरोत्तर लोकप्रियता लाभत गेली. ‘कथ्’ म्हणजे सांगणे, निवेदन करणे. ‘कथ्’ या मूळ धातूपासून ‘कथा’ हा शब्द रूढ झाला आहे. भारतात कथा या साहित्यप्रकाराला फार मोठी परंपरा आहे. कथा म्हणजे... प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. नंतर-नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात. स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदनशैलीही असते. कथेतील पात्रांच्या परस्परसंबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंतही कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्षबिंदूही (क्लायमॅक्स) असतो कथेत! अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षकही असते.
थोडक्यात सांगायचे तर... कथा म्हणजे... ‘एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्परसंबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा.’ अर्थात प्रत्येक कथेत हे सर्वच घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणही सारखे असेल असे म्हणता येणार नाही. एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर एखाद्या कथेत प्रसंगांना. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो तर एखादी कथा वातावरणनिर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांचीही असू शकते. थोडक्यात, कथा म्हणजे केवळ प्रसंगांचे वर्णन नव्हे, केवळ व्यक्तींचे चित्रण नव्हे, निव्वळ दृष्टिकोन किंवा एकाच विचाराचा परिपोष नव्हे, तर कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदनशैली अशा सर्वांचे एक सुसंघटित प्रकटीकरण होय
कथेची पूर्वपीठिका
१८९० मध्येश्रेष्ठ कादंबरीकार ह. ना. आपटे यांनी ‘करमणूक’ या साप्ताहिकाची सुरुवात केली. या साप्ताहिकातून त्यांनी दैनंदिन जीवनाशी संबंधित साध्या व हृदयस्पर्शी कथा प्रकाशित केल्या. पुढे कथेच्या स्वरूपात कालानुरूप बदल होत गेले. आशय आणि अभिव्यक्तीत परिवर्तन होऊन कथा सामर्थ्यवान झाली. अधिकाधिक विषयांना स्पर्श करत ती बहुआयामी होत गेली. लेखनतंत्रातही प्रयोग झाले. त्यानंतर ग्रामीण कथा, दलित कथा यांनी कथावाङ्मयाला समृद्ध केले. स्त्री शिक्षणाच्या प्रसाराचा प्रभाव साहित्यावरही झाला. स्त्रियांचे अनुभव कथेच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले. त्यामुळे एकूणच कथेचा प्रवाह आणि आशय दोन्हीही वृद्धिंगत होत गेले. अशी ही जीवनाचे विविधांगी दर्शन घडवणारी कथा आजही वाचकांना आकृष्ट करत आहे. कथेचे घटक (१) कथाबीज : कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरतो. हे करताना तो निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांचे साहाय्य घेतो. या सर्व घटकांच्या मदतीने घटनामालिकेचे कथात्म साहित्यात रूपांतर होते; म्हणून कथेत ‘घटना’ हा महत्त्वाचा भाग ठरतो. कथेत या मूळ घटनेलाच ‘कथाबीज’ असे म्हणतात.
(२) कथानक :
कथानकात घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाववैशिष्ट्ये, वातावरण इत्यादींचे तपशील हळुवारपणे उलगडत जातात. कथेत कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाहीपणही जपले जाते. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते.
(३) पात्रचित्रण :
पात्रचित्रण हा कथेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रणातून कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवनपद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. या शब्दरूप प्रतिमेला ‘पात्र’ असे म्हणतात. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते, म्हणून वाचकांची त्या पात्रांशी जवळीक साधली जाते. ही पात्रे कथाकाराची ‘स्व’ निर्मिती असते.
(४) वातावरण निर्मिती :
कथेला स्थळ-काळाबरोबरच सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादींनी युक्त वातावरण असते. या वातावरणाचा वाचकांवर परिणाम होऊन तो कथानकाशी एकरूप होतो. वातावरणाचा पट जितका सघन तितकी कथा सकस होते.
(५) नाट्यमयता/संघर्ष :
कथेत चांगल्या-वाईटाचा संघर्ष असतो. त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातूनच कथा उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचते. कथेत प्रत्येक वेळी संघर्षकिंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही, तर आनंद आणि सुखात्मिक घटनांतूनही नाट्यमयता निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्षबिंदू नाट्यपूर्णरीतीने साधता येतो; पण तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करतो
(६) संवाद :
कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. पात्रांच्या स्वभावधर्मानुसार व परिस्थितिजन्य घटकांनुसार संवाद लिहिले जातात. या संवादात लय व आंतरिक संगती महत्त्वाची असते. संवादातून रसनिर्मिती आणि रसपरिपोष होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात.
(७) भाषाशैली :
कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेतील पात्रांच्या स्वभाववैशिष्ट्यांनुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. कथाकार, त्याचा दृष्टिकोन, त्याची अनुभव घेण्याची पद्धत यांनुसार कथेचे भाषारूप आणि शैलीविशेष निश्चित होत जातात. कथा लिहिताना साधारणत: प्रमाण भाषा आणि बोली भाषा यांची सरमिसळ केली जाते. तसेच कथा पूर्णपणे बोलीभाषेतही लिहिली जाते. वरील घटकांशिवाय प्रारंभ, मध्य आणि शेवट असे कथेचे सर्वसाधारणपणे तीन टप्पे मानले जातात. कथेची सुरुवात कधी विरोधाभासातून, कधी पात्रांच्या परस्परविरोधी भूमिकांतून तर कधी परिस्थितीजन्य प्रसंगातून होत असते. ही सुरुवात जितकी नाट्यपूर्ण, जितकी उत्कट तितकी वाचकांची उत्कंठा अधिक तीव्र होते. ही उत्कंठा कथेच्या शेवटपर्यंत कायम राखली जाते. कथेच्या रचनाबंधाला यामुळे सौंदर्य प्राप्त होते. कथालेखनात कथेच्या वरील घटकांबरोबरच शीर्षकाचे महत्त्वसुद्धा अनन्यसाधारण आहे. सूचक व अर्थपूर्ण शीर्षक कथेचा आशय उलगडण्यास मदत करते. कथेची वैशिष्ट्ये मराठी भाषेचे कथादालन खूप समृद्ध आहे. ते विविधतेने आणि गुणवत्तेने नटलेले आहे. त्यामुळेच मराठी कथा अनेकविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण झाली आहे.
(१) कथा मनोरंजन करते.
मराठी कथा विलक्षण मनोरंजक आहे. तिची खुमारीच मोठी न्यारी आहे. मराठीत सर्वांत जास्त वाचला जाणारा साहित्यप्रकार म्हणजे ‘कथा’ होय. दिवाळी अंकांमध्ये कथेला मानाचे पान दिले जाते, ते तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळे. आबालवृद्ध कथा सांगण्याचा आणि ऐकण्याचा आनंद मनमुराद लुटतात तो तिच्या या मनोरंजकतेमुळेच. मनोरंजनाची कितीतरी अत्याधुनिक साधने-उदा., टी. व्ही. वगैरे खूप नंतर उदयास आली; पण पहिला मान कथेचाच. कथा सर्वांनाच हवीहवीशी वाटते याचे कारण तिच्या मनोरंजकतेत दडले आहे. मुले तर गोष्ट सांगण्यासाठी भंडावून सोडतात. मोठी माणसेही याला अपवाद नसतात. माणूस गोष्टीवेल्हाळ झाला तो तिच्या ‘मनोरंजकता’ या वैशिष्ट्यामुळेच.
(२) कथेमुळे सुसंस्कार होतात.
मनोरंजकतेप्रमाणेच मनावर संस्कार करण्याचीही जबरदस्त ताकद कथेत असते. कथेच्या माध्यमातून ‘मूल्यविचार’ रुजवता येतात. कथा प्रेरणा, स्फूर्ती, बोध, ज्ञान देते. मानवता, सत्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव, औदार्य, धैर्य, श्रमनिष्ठा, संवेदनशीलता, दया, सहकार्य अशा कितीतरी मूल्यांचा संस्कार कथा करते. मानवी मूल्यांची कदर करणारी आदर्श व्यक्तिमत्त्वे कथावाङ्मयात जागोजागी आढळतात. सामान्य माणूस प्रसंगी आभाळाएवढा मोठा कसा होऊ शकतो हे एखाद्या बोधकथेच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर ठसवता येते. या संस्कारक्षमतेच्या वैशिष्ट्यामुळेच तर कथेतून सद्गुणांचे पाथेय देता येते.
(३) कथा वाचकांची उत्कंठा वाढवते.
कथा वाचताना अनेकदा ‘आता पुढे काय होणार’ अशी उत्सुकता वाचकाच्या मनात निर्माण होते. त्याच्या मनात जिज्ञासा जागी होते. कारण कथानक वाचकाला खिळवून ठेवणारे असते. कथेतील पात्रे आणि प्रसंग यांची गुंफण अशा कौशल्याने केलेली असते, की वाचक त्यात तल्लीन होऊन जातो. वाचकाला वर्तमानातून भूतकाळात घेऊन जाणे आणि पुन्हा वर्तमानात आणणे अशा फ्लॅशबॅक लेखनशैलीमुळे कथा उत्कंठावर्धक होते. यादृष्टीने पाठ्यपुस्तकातील ‘शोध’ ही कथा एकदा वाचा. त्या कथेतील आकस्मिक वळणे, नाट्यमय प्रसंग, कथेचा अनपेक्षित शेवट या सर्वांमुळे उत्कंठा शेवटपर्यंत कशी टिकून राहते, हे तुमच्या लक्षात येईल.
(४) कथा एककेंद्री असते.
अनुभवाचे, रचनेचे एककेंद्रित्व हे कथेचे वैशिष्ट्य आहे. कादंबरी वा नाटकाप्रमाणे ती बहुकेंद्री नसते. कथेतील प्रसंग, पात्रे, वातावरण मर्यादित असते म्हणूनच ती लहान असते, लघू असते. ती पसरट नसते. तिचे स्वरूप स्फुट (छोटे) असते.
(५) कथा भूतकाळात लिहिली जाते.
सर्वसाधारणपणे कथा भूतकाळात लिहिली जाते. कथेत होऊन गेलेल्या घटनांविषयीचे निवेदन असते. उदा., एक होते गाव. तिथे एक दानशूर माणूस राहायचा; ही अशी वाक्यरचना सर्वसाधारणपणे कथेत आढळते. कथेत एखादी हकीकत असते, घडून गेलेले प्रसंग असतात, त्यांचे वर्णन असते. त्यामुळे आपोआपच कथालेखनासाठी भूतकालीन निवेदनशैली वापरली जाते.
(६) कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो.
कथा मानवी जीवनाचा थेटपणे वेध घेते. ती जीवनस्पर्शी असते. राजाराणी असो वा एखादा टॅक्सीड्रायव्हर, नर्स असो वा गावातला लोकसेवक; त्या प्रत्येकाच्या जीवनातील घटनांचा, भावभावनांचा, वैचारिक उलथापालथींचा धांडोळा घेण्याची ताकद कथेत असते. कथेला एकही जीवनविषय वर्ज्य नाही. बालपणी काऊचिऊच्या रूपाने मानवी जीवनात प्रवेश करणारी कथा आयुष्यात ठाण मांडून बसलेली असते. जीवनाचा वेध घेण्याचे हे वैशिष्ट्य कथेची खासियत आहे.
(७) श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते.
सादरीकरण म्हणजे सादर केले जाणे, सांगणे, कथन करणे. कथा सादर केली जाते. कथामाला, बालकमेळावे, बालसाहित्य संमेलने इथे आवर्जून कथा सांगितल्या जातात. नाटके, कादंबऱ्या, निबंध वा लेखसंग्रह यांचे कथन फारसे होत नाही; पण कथाकथन मात्र घरोघरी, शाळाशाळांमध्ये, साहित्यविषयक कार्यक्रमांमध्येनित्यनेमाने घडत असते. कथा सांगणाऱ्याने ती मनोभावे सांगणे आणि ऐकणाऱ्याने ती एकचित्ताने ऐकणे ही सांस्कृतिक देवघेव पूर्वी होत होती, आज होत आहे, उद्याही होत राहील.
कथेचे सादरीकरण
कथेचे ‘सादरीकरण’ ही एक कला आहे आणि योग्य प्रयत्नाने ही कला साध्य होऊ शकते. विविध प्रकारच्या कथांचे मूकवाचन, प्रकट वाचन करण्याचा सराव, विविध कथा लेखकांची/लेखिकांची लेखनशैली समजून घ्यायचा केलेला प्रयत्न, भाषेची जाण, शब्दोच्चार आणि सादरीकरण कौशल्ये यांमुळे कथाकथनाचे तंत्र अवगत होऊ शकते. अलीकडच्या काळात ‘कथाकथन’ क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत. कथा-अभिवाचनाचे कार्यक्रम विविध निमित्ताने रंगमंचावरून सादर केले जात आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन या लोकप्रिय माध्यमांतून सादर केले जाणारे ‘कथाकथन’ अधिकाधिक लोकांना आकर्षित करत आहे. या पार्श्वभूमीवर कथा-सादरीकरण हा पैलू लक्षणीय ठरतो.
अभिवाचन
अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्यप्रकारे पोहोचण्यास मदत हाेते. कथेचे अभिवाचन एकाच वेळी जर अनेकांकडून केले गेले तर आवाजाचा एकसुरीपणा टळतो. संवादातील चढउतार, चटपटीतपणा, शब्दफेक यांतील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळतो. कथेतील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा यांचे आकलन होण्यास मदत होते. कथावाचनाला जर पार्श्वसंगीताची, प्रकाशयोजनेची, नेपथ्याची जोड दिली तर ते अभिवाचन श्रोत्यांवर चांगला
परिणाम
करते व दीर्घकाळ स्मरणात राहते. कथाकथन कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला भाषेच्या ज्ञानाबरोबरच वाचिक अभिनयाचीही थोडी जोड द्यावी लागते, त्यामुळे कथाकथन उठावदार होते. कथाकथन करणाऱ्याला शब्दांच्या माध्यमांतून पात्रांना जिवंत करायचे असते. कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला कथा सादर करायची असल्याने कोणताही लिखित मजकूर हातात नसतो. श्रोत्यांशी संवाद साधत, त्यांचा प्रतिसाद घेत, लेखकाच्या मूळ संहितेला धक्का न लावता; पण परिणामकारकरीत्या ती श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची असते. कथेची निवड करणे फार महत्त्वाचे व तितकेच जबाबदारीचे काम असते. कथा सादरीकरणाचा कालावधी व श्रोत्यांचा अवधान काळ यांचे भान कथा सादरीकरणात ठेवावे लागते. कथा ही संवादातून खुलत असल्याने शब्दफेक, प्रभावी उच्चारण, स्पष्टता आणि शब्दांचा गर्भितार्थ श्रोत्यांपर्यंत थेट पोहोचवणे हे एकाचवेळी कौशल्यपूर्ण पण आव्हानात्मक काम असते. कथेच्या सादरीकरणाला तंत्रज्ञानाची जोड देऊन सामाजिक संपर्काच्या माध्यमांतून आज कथा वाचकांसमोर येते.
समारोप
मौखिक परंपरेपासून सुरू झालेला कथेचा प्रवाह आजही सक्षमपणे खळाळता राहिला आहे. आजही मनोरंजन आणि नित्यनूतन अनुभव देण्याची कथेची क्षमता टिकून आहे. कालानुरूप कथेचे विषय, आशय आणि अभिव्यक्ती बदलत गेली; परंतु ती समाजाशी व संस्कृतीशी बांधील राहिल्याने लोकप्रिय राहिली. वाचकांना कथावाचनाचा आनंद साप्ताहिके, मासिके व दिवाळी अंकांपासून ते सामाजिक संपर्कमाध्यमे या सर्व माध्यमांतून मिळतो. भाषासौंदर्य, आशयसौंदर्य, अभिव्यक्ती विशेष, सादरीकरण, मनोरंजन आणि बोध या विशेषांमुळे कथा आजही लोकप्रिय आहे.
वाचा.
काही प्रमुख कथाकार व त्यांचे कथासंग्रह *
(१) ना. सी. फडके- ऊन आणि सावल्या
(२) वि. स. खांडेकर- फुले आणि दगड
(३) य. गो. जोशी- शेवग्याच्या शेंगा
(४) कुसुमावती देशपांडे- दीपकळी
(५) विभावरी शिरूरकर- कळ्यांचे नि:श्वास
(६) पु. भा. भावे- सतरावे वर्ष
(७) मालतीबाई दांडेकर- विसाव्याचे क्षण
(८) वामन चोरघडे- प्रस्थान
(९) श्री. ज. जोशी- मामांचा वाडा
(१०) अरविंद गोखले- मंजुळा
(११) अण्णा भाऊ साठे- कृष्णाकाठच्या कथा
(१२) शंकरराव खरात- टिटवीचा फेरा
(१३) जी. ए. कुलकर्णी- काजळमाया
(१४) गंगाधर गाडगीळ- तलावातले चांदणे
(१५) शंकर पाटील- वळीव
(१६) द. मा. मिरासदार- मिरासदारी
(१७) व्यंकटेश माडगूळकर- हस्ताचा पाऊस
(१८) विद्याधर पंुडलिक- पोपटी चौकट
(१९) व. पु. काळे- गुलमोहर
(२०) मधु मंगेश कर्णिक- झुंबर
(२१) विजया राजाध्यक्ष- अधांतर
(२२) ज्योत्स्ना देवधर- पैलतीर
(२३) शैलजा राजे- वेगळ्या वाटा
(२४) वामन होवाळ- वाटा आडवाटा
(२५) जयंत नारळीकर- यक्षाची देणगी
(२६) आशा बगे- मारवा
(२७) रा. रं. बोराडे- नातीगोती
(२८) गौरी देशपांडे- आहे हे असं आहे
(२९) योगीराज वाघमारे- बेगड
(३०) भास्कर चंदनशिव- अंगारमाती
(३१) उर्मिला पवार- चौथी भिंत
(३२) भारत सासणे- बंद दरवाजा
(३३) सानिया- भूमिका
(३४) प्रतिमा इंगोले- सुगरनचा खोपा
(३५) प्रा. अाप्पासाहेब खोत- माती आणि कागुद
(३६) आसाराम लोमटे- आलोक
कथा-साहि त्यप्र कार-परिचय | Katha Sahityaprakar parichay
Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board
Chapter 1.03: आयुष्य... आनंदाचा उत्सव
Chapter 1.04: रे थांब जरा आषाढघना
Chapter 1.06: आत्मविश्वासासारखी शक्ती नाही (नमुना गद्य आकलन)
Chapter 2.09: समुद्र कोंडून पडलाय
Chapter 2.12: रंगरेषा व्यंगरेषा
Chapter 3: कथा-साहि त्यप्र कार-परिचय
Chapter 5.01: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
Chapter 5.02: लेखन : निबंधलेखन
HSC Marathi Question Paper 2020 PDF - Std 12th Science, Commerce & Arts - Maharashtra Board
Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board
Author: Balbharati
Publisher: Maharashtra State Bureau of Textbook Production and Curriculum Research
Language: Marathi
Also Read: मराठी निबंध यादी
.